About Jaya Mahabharat Ebook (Hindi)
‘महाभारत’ म्हणजे मूळचे ‘जय’. भारतीय उपमहाद्विपातील सर्वार्थाने देदीप्यमान असणाऱ्या या महाकाव्याचे कथन करीत असताना देवदत्त पट्टनायक महाभारताची अभिजात संस्कृत संहिता, त्यावर भारतातल्या प्रादेशिक लोकसाहित्यातून करण्यात आलेली भाष्ये, ज्यामध्ये छत्तीसगढमधल्या पांडवानीपासून महाराष्ट्रातल्या गोंधळ, तामिळनाडूतल्या तेरुकुट्टू ते कर्नाटकातल्या यक्षगानापर्यंत साऱ्यांचा आधार घेताना दिसतात.
महाभारताचे हे कथन इथे एकूण एकशे आठ प्रकरणांमध्ये विभागलेले तर आहेच पण त्यासह या कथनाला स्वतः लेखकाने विचारपूर्वक रेखाटलेल्या अंदाजे अडीचशे समृद्ध आणि नेत्रसुखद रेखाचित्रांची जोडही देण्यात आली आहे. या कथनात सर्वसामान्य वाचकाला क्वचितच ज्ञात असणाऱ्या महाकाव्यातील अनेक तपशिलांवर प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. उदा. इथे शंभर कौरवांच्या नावांची यादी आहे. तामिळनाडूमध्ये एक देवता म्हणून द्रौपदीची जी आराधना केली जाते त्याविषयीची माहिती आहे. तसेच अस्तिक, माधवी, जैमिनी, इरावण आणि बार्बरिक यांचा कहाण्यांचा समावेश या कथनात केलेला आहे. मूळ महाभारतात शकुंतलेचे आख्यान कसे आले आहे; महाभारतातले रामायण काय म्हणते; हेही इथे आपण पाहू शकतो. केवळ एव्हढेच नव्हे तर, कुरुक्षेत्रावरील युद्धाचा नेमका कालावधी कोणता या प्रश्नांचे, तत्कालीन आकाशस्थ ग्रह आणि ताऱ्यांच्या अवस्थांचा अभ्यास करून दिले गेलेले उत्तरही आपणाला या कथनात दिसेल.
साधी, सरळ आणि तरीही सुस्पष्ट, ओघवती कथनशैली, कथनाच्या अखंड प्रवाहात डौलदारपणे येणाऱ्या महाभारतातल्या बहुविध कथा, त्यातली स्वगते, त्यातले संवाद, त्यातले मुक्तचिंतन या साऱ्या रत्नजडीत संभारातून महाभारत हे कालातीत आहे हे जसे वाचकाला समजते तसेच मानवाच्या आयुष्यातल्या गुंतागुंतीच्या, अस्वस्थ करणाऱ्या चित्रविचित्र आणि कुणाचेही चित्त विचलित करणाऱ्या विविध अवस्थांवर महाभारतात जे भेदक भाष्य करण्यात आले आहे ते एकमेवाद्वितीय असेच आहे!
Reviews
There are no reviews yet